Sunday, October 31, 2010

पोलादपूर तालुक्यात शेतक-यांना काळी आईचे वरदान नकोय?




पोलादपूर तालुक्यातील ३७ हजार २०४ हेज्ञाटर भौगोलिक क्षेत्रापैकी २५ हजार ४३७ हेक्टर जमीन लागवडीस योग्य असूनही या शेतकरीबहुल तालुक्यात एकीकडे जमीन माफियांचा सुळसुळाट आणि दुसरीकडे बेकारी पराकोटीला पोहोचत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्यक्षात केवळ कागदं रंगविण्याकडे कल असलेल्या शेतक-यांना राजकारण केल्याचा आनंद क्षणिक मिळत असला तरी काळी आईच्या सेवेत आता कोणी शेतकरी रममाण होताना दिसला तर त्याला शेतीकामाची हौस आहे, असे कौतुकाने म्हटले जात आहे. पण नित्यनेमाने काळ्या आईची सेवा केल्याचे फळ अधिक भरभराट करणारे असूनही शेतक-यांना हे वरदान नको की काय, असे वाटण्याइतपत शेतीविषयक उदासिनता दिसून येत आहे.तालुक्यात यावर्षी झालेली ३५०० हेक्टरवर भातलागवड आणि नाचणी १६५० हेक्टर तर वरी ८०० हेक्टर तसेच कडधान्यामध्ये तूर १९५ हेक्टरवर तर अन्य कडधान्य १०० हेक्टरवर लावण्यात आल्याची खरिप हंगामाची आकडेवारी सांगत आहे. पाऊस जेव्हा नवरात्रौत्सवानंतरही पडतो तेव्हा तो किडयांपासून संरक्षण करण्यासह पिकाची प्रत वाढविण्यासही उपयुक्त असतो, अशी शेतक-यांमधील वदंता आता मात्र, पावसाने केले नुकसान मायबाप सरकार भरपाई देईल काय? या वदंतेमध्ये बदलली आहे. त्यामुळेच की काय कृषी विभागाने दिलेली आकडेवारी फुगवून सांगितल्यासारखी वाटते.
खरिप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही तालुक्यात मूग, चवळी, भूईमूग, वाल, पावटा, कलिंगड, काकडी, वांगी, टॉमेटो, कोबी व भाजीपाला आदी लागवड शेतक-यांकडून केली जाते. पाण्यासाठी पंपाद्वारे उपसासिंचन तर वनराई बंधा-यांचाही वापर केला जातो. तालुक्यात यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जवार विहिर व फलोत्पादन योजना धर्तीवर शेततळे योजनादेखील यशस्वी झाली आहे. तुषार संच योजनेत ७५०० रूपये प्रतिशेतकरी अनुदान देण्यात येणार आहे. डिझेल पंपासाठी एचडीपीई पाईपसाठी प्रतिशेतकरी ८०० मीटर्स पाईपचे अनुदान २५ टक्क्यांप्रमाणे १५ हजार रूपये मर्यादेमध्ये देण्यात येणार आहे.
नवीन धान्य विकास आयसोकोन कार्यक्रमांतर्गत भूईमूग व तेलबिया लागवड करणा-या शेतक-यांसाठी तेलघाणा सुरू करण्यास केंद्रपुरस्कृत ३० हजारांपर्यंत अनुदानात पंपसंच ५ लाभार्थ्यांचे उद्दीष्ट आहे. तालुक्यात पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ४३ ग्रामपंचायतींतर्गत ८७ गांवाचा समावेश असून यात ७ समूह निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी २६००० हेक्टर क्षेत्र ५ समूहामध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. ग्रामपांयत निहाय सचिवास प्रत्येकी ३ हजार रूपये मानधन देण्याच्या तरतूदीप्रमाणे तालुकास्तरावरील पाणलोट विकास पथकात एमएसडब्ल्यू अर्हताधारक समाजसेवकास ७५०० रूपये अनुदेय मानधन, एक महिला सामाजिक कार्यकर्ती व एक पुरूष समाजसेवक यांचा समावेश मानधन तत्वावर करण्यात येणार आहे.
तालुक्यात कधीतरी कोणी स्ट्रॉबेरी व भाजीपाला घेत असे. पण यावर्षी तालुका कृषी कार्यालयामार्फत महाबळेश्वरप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातही स्ट्रॉबेरी व भाजीपाला लागवडीस प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरिप हंगामात खतांचा पुरवठा पुरेसा होता तर रब्बी हंगामात गांडूळ आणि बायोडायमेट्रीक्स खतासाठी प्रत्येकी ३०० रूपये अनुदानात यंदा १०० शेतक-यांना बॅक्टेरिया पुरविण्यात येणार आहेत. सेंद्रीय खत निर्मितीसाठी ४ शेतक-यांना प्रत्येकी २५०० रूपये गांडूळ खतासाठी देण्यात येणार आहेत तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य लागवडीसाठी ५४० किलो झिंक सल्फेट वितरीत करण्यात येणार आहे. २० नॅपसॅक फवारणी यंत्रांचे वाटप करण्याचे उद्दीष्टय असताना ३० ते ४० शेतक-यांची मागणी येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमात ६०० चौ.फूट बांधकामासाठी ३ लाखांपैकी १.५ लाख रूपये अनुदान तत्वावर पॅकहाऊस बांधण्यासाठी फळ प्रक्रिया उद्योगास देण्यात येणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडने रायगड व महाराष्ट्र सरकारच्या कृषी खात्याच्या समन्वयाने महाकृषी संचार मोबाईल सेवा विविध सुविधांसह सुरू केल्याने राज्यातील अडीच लाख शेतकरी एकमेकांशी अमर्याद बोलू शकणार आहेत.
पोलादपूर तालुका कृषी अधिकारी दिलीप काकडे आणि या कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक तालुक्यातील शेतक-यांना काळ्या आईच्या सेवेसाठी सरकारच्या या विविध योजनांचे आमिष दाखवून प्रवृत्त करण्यास गावोगांव फिरत असताना अनेक शेतकरी मात्र गांवोगांवात फिरणा-या रियल इस्टेटच्या नांवाखाली जमीनमाफियागिरी करणा-यांकडे काळ्या आईचा सौदा मांडताना दिसत असल्याने ते या वरदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शैलेश पालकर
9226849185